- काम नाकारणाऱ्यांवर कारवाई होणार नाही; आर्थिक सहाय्याचा प्रस्ताव असल्याचे अतिरिक्त उपआयुक्त कुलदीप जंगम यांचे आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ जुलै २०२६) :- सहाय्यक बीएलओचे काम सक्तीने लादू नये, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा कर्मचारी संघाच्या वतीने शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयासमोर शेकडो आशा स्वयंसेविकांनी भर पावसात निदर्शने केली. आंदोलनानंतर अतिरिक्त उपआयुक्त कुलदीप जंगम यांना निवेदन देण्यात आले.
बैठकीत कुलदीप जंगम यांनी सहाय्यक बीएलओचे काम जबरदस्तीने लादले जाणार नाही तसेच काम नाकारणाऱ्या कोणत्याही आशा सेविकेवर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन दिले. तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेत आशा सेविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करत त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती दिली. कार्यमुक्त करण्यात आलेल्या आशा सेविकांना पुन्हा नियमित करण्याची कार्यवाहीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
संघटनेने आशा सेविकांवर आरोग्य सेवेसह अतिरिक्त निवडणूक कामाचा ताण येत असल्याने बीएलओची सक्ती करू नये, अशी भूमिका मांडली. आंदोलनादरम्यान दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि राज्यातील स्मार्ट मीटरविरोधी आंदोलनालाही पाठिंबा जाहीर करण्यात आला.
यावेळी राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड निलेश दातखिळे, पालिका संघ अध्यक्षा चंद्रा कांबळे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.


















