- कठीण परिस्थितीवर मात करत UPSC मध्ये १२५ वा क्रमांक पटकावणाऱ्या कबीर कांबळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; आमदार अमित गोरखे यूथ फाउंडेशनचा सोहळा उत्साहात संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ जुलै २०२६) :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच कै. गणपत गोरखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘अमित गोरखे यूथ फाउंडेशन’ यांच्या वतीने आयोजित ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६’ अत्यंत उत्साहात पार पडला. बुधवार (दि. २२ जून) रोजी नोवेल स्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमात दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणाऱ्या या उपक्रमाचे हे सलग सातवे वर्ष ठरले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी ‘कै. गणपत गोरखे शिष्यवृत्ती’ चे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
अपयशाला न घाबरता सातत्याने अभ्यास करा – कबीर कांबळे..
यूपीएससी परीक्षेत देशात १२५ वा क्रमांक मिळवणारे शहराचे सुपुत्र कबीर कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या यशामागील संघर्षमय प्रवास उलगडला.
ते म्हणाले, “यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत एक टक्क्यांपेक्षाही कमी उमेदवार यशस्वी होतात. ग्रॅज्युएशननंतर मी सलग अनेकदा सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत अपयशी ठरलो. मात्र, प्रत्येक अपयशानंतर माझ्या आई-वडिलांनी आणि भावाने माझा आत्मविश्वास वाढवला. मी नापास झालो तरी त्यांनी मला मिठाई भरवून पुढे जाण्याची प्रेरणा दिली.”
याच विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात पूर्वी आपणही पुरस्कार स्वीकारला होता आणि आज त्याच व्यासपीठावर विद्यार्थ्यांचा गौरव करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
“मोबाईलपासून दूर राहून, कोणत्याही क्लासशिवाय सलग १२ महिने दररोज १२ तास स्व-अभ्यास केला. हेच माझ्या यशाचे रहस्य आहे. विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरू नये, सातत्याने अभ्यास करावा आणि सोशल मीडियाचा वापर केवळ गरजेपुरताच करावा,” असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
आजच्या तरुण पिढीसाठी व्यासपीठावरील मान्यवर आदर्श – अमित गोरखे..
कार्यक्रमात आमदार अमित गोरखे म्हणाले, “राजकारण म्हणजे केवळ हार-तुरे स्वीकारणे नसून ती समाजसेवेची आणि जबाबदारीची कसोटी आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात योग्य आदर्श निवडले, तर यश निश्चित मिळते. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत.”
पालकांनी मुलांना अपयश स्वीकारण्याचे स्वातंत्र्य द्यावे – विक्रांत बागडे..
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बागडे यांनी पालकांच्या भूमिकेवर भर देताना सांगितले की, पालकांनी मुलांना अपयश स्वीकारण्याचे आणि स्वतःच्या आवडीची वाट निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. मुलांशी सातत्याने सुसंवाद ठेवणे आवश्यक आहे.
“एखादा रस्ता पुन्हा बांधता येतो; मात्र मुलांचे शिक्षण चुकले, तर संपूर्ण पिढीचे नुकसान होते. आजची पिढीच उद्याचा देश घडवणार आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना योग्य दिशा देण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती…
या सोहळ्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बागडे, यूपीएससीमध्ये देशात १२५ वा क्रमांक मिळवणारे कबीर कांबळे, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, नगरसेवक कुशाग्र कदम, नेताजी शिंदे यांच्यासह विविध नगरसेवक, पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















