न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ जुलै २०२६) :- दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक चैताली गपाट यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, पिंपरी-चिंचवड यांनी नियमित जामीन मंजूर केला. न्यायालयाने ₹५० हजारांच्या जातमुचलक्यावर तसेच आवश्यक अटी व शर्तींसह हा आदेश दिला.
आरोपीतर्फे ॲड. राकेश सोनार यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करून सविस्तर युक्तिवाद केला. तपासासाठी आरोपीने पूर्ण सहकार्य केले असून, प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. पुरावे नष्ट करणे, साक्षीदारांवर दबाव आणणे किंवा न्यायप्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचा कोणताही ठोस आधार नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी अधोरेखित केलेल्या “Bail is the Rule and Jail is the Exception” या न्यायसिद्धांताचाही आधार देण्यात आला.
सरकारी पक्षाने जामीन अर्जास विरोध करत तपासावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, तपासाची सद्यस्थिती आणि अभिलेखावरील कागदपत्रांचा विचार करून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. यादव यांनी चैताली गपाट यांना नियमित जामीन मंजूर केला. या प्रकरणात ॲड. अविनाश खुडे, ॲड. ओंकार औसेकर, ॲड. प्रशांत पोतदार, ॲड. जावेद जमादार, प्रतीक भेगडे पाटील, अनिरुद्ध पाऊल आणि अदिती वाघमारे यांनीही सहकार्य केले.


















