न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३० जुलै २०२६) :- पिंपळे सौदागरच्या चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गुरुजनांप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरूंच्या महत्त्वावर आधारित भाषणे, श्लोक, समूहगीत आणि सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच शिक्षकांना शुभेच्छापत्रे आणि पुष्पगुच्छ देत त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योतिका मल्कानी यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत, “गुरू हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ असून त्यांच्या मार्गदर्शनातूनच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडते,” असे सांगितले.
शाळेचे चेअरमन संदीप काटे यांनी सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत त्यांच्या समर्पित कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर राखून त्यांच्या मार्गदर्शनातून आदर्श नागरिक बनावे, असा संदेशही त्यांनी दिला.
कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. आनंद, संस्कार आणि कृतज्ञतेच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून “गुरू म्हणजे ज्ञानाचा अखंड दीप, जो विद्यार्थ्यांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून यशाचा मार्ग उजळून टाकतो,” हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडला.


















