- महाराष्ट्र रिक्षा पंचायतचा ऐतिहासिक निर्णय – डॉ. बाबा कांबळे…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३० जुलै २०२६) :- ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अॅप-आधारित सेवांना पर्याय म्हणून पिंपरी-चिंचवडमधील पीसीएमसी मेट्रो स्थानके व परिसरातील रिक्षा स्टँडवर १५ ऑगस्ट २०२६ पासून मीटरप्रमाणे रिक्षा सेवा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र रिक्षा पंचायतने जाहीर केला आहे. संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
बैठकीत शहरात अधिकृत मीटरप्रणाली, प्रवाशांचा विश्वास वाढविणे आणि रिक्षाचालकांचे आर्थिक शोषण रोखण्याबाबत चर्चा झाली. प्रशासनाकडून आवश्यक कायदेशीर सहकार्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शहराध्यक्ष विजय ढगारे पाटील यांनी मीटरप्रमाणे रिक्षा आणि ‘शेअर-ए-रिक्षा’ सेवा ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. प्रवक्ते धनंजय कुदळे यांनी पोलिस व वाहतूक विभागाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
या शिष्टमंडळात रोहन जोगदंड, महेश शिंदे आणि देवाप्पा कांबळे यांचाही सहभाग होता.


















