न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३० जुलै २०२६) :- उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदे गाव येथे एका कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये झालेल्या मारामारीत दोन कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना २८ जुलै रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता घडली.
याप्रकरणी कंपनीचे सुपरवायझर रविंद्र विलास पवार (वय ४३, रा. वडमुखवाडी, चऱ्होली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिरंजीत बसूमातो (वय ३७, रा. अलिपुरादुर, जि. जलपैगुरी, पश्चिम बंगाल) आणि सागर अमरूष उरानो (वय ४३, रा. महाकालगुरी, मुक्ताला, जि. जलपैगुरी, पश्चिम बंगाल) यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन सागर उरानो याने लाकडी पाटाने चिरंजीतच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे.
या घटनेत चिरंजीत बसूमातो यांचा मृत्यू झाला. मारामारीत गंभीर जखमी झालेला आरोपी सागर अमरूष उरानो याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढोले करत आहेत.


















