न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०७ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील बंद असलेले सर्व १३ जलतरण तलाव तातडीने सुरू करण्यात यावेत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडे केली. त्यानंतर उपमहापौर बाबर यांनी नागरिकांसह अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले.
यावेळी उपायुक्त पंकज पाटील, कैलास तापकीर, डॉ. चंद्रकांत चौधरी, शिवाजी आढाव, प्रमोद शहाणे, राजेंद्र पोतदार, अनिल पवार आदी उपस्थित होते. शहरातील सर्व जलतरण तलाव बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक, जलतरणपटू आणि क्रीडाप्रेमींची गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
पवना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या दूर झाली असून जलतरण तलाव सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे उपमहापौर बाबर यांनी सांगितले. याची दखल घेत अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी उपायुक्त पंकज पाटील यांना शहरातील सर्व १३ जलतरण तलाव तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नागरिकांना लवकरच ही सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

















