न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०७ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. कर्मचारी महासंघाच्या विविध मागण्यांचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पदोन्नती, सेवा ज्येष्ठता, जुनी पेन्शन योजना, सेवा प्रवेश नियम, आकृतीबंध, धन्वंतरी योजना, आश्वासित प्रगती योजना, १०, २० व ३० वर्षांच्या लाभांसह आगाऊ वेतनवाढ, घरबांधणी, वाहन व संगणक कर्ज अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसबाबतचा करार लवकर करण्याचाही निर्णय घेण्यात आला. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी संबंधित विभागांना सर्व प्रस्ताव व आवश्यक कार्यवाही गतीने पूर्ण करून कर्मचारी हिताचे प्रश्न नियमांच्या चौकटीत आणि वेळेत निकाली काढण्याचे निर्देश दिले. त्यांनी प्रत्येक मागणीचा वस्तुनिष्ठ विचार करून निर्णयक्षम प्रकरणांमध्ये कोणताही विलंब होणार नसल्याचेही स्पष्ट केले.


















