- कुणाल मार्केट आग दुर्घटनेची सखोल चौकशी करा..
- भाऊसाहेब भोईर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | २ नोव्हेंबर २०२६ :- चिंचवडगाव येथील कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीच्या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे गटनेते भाऊसाहेब भोईर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करण्याची मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
चिंचवडगाव येथील कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगमध्ये बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली होती. या इमारतीमध्ये सुमारे ४० दुकाने आणि ३८ सदनिका आहेत. आगीमध्ये पार्किंगमधील सुमारे ४० वाहने जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, या घटनेची तीव्रता पाहता भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या आगीच्या घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे भोईर यांनी निवेदनात म्हटले आहे.
या दुर्घटनेमागील नेमके कारण, विद्युत यंत्रणेतील त्रुटी आणि सुरक्षाविषयक नियमांचे पालन झाले होते का, याची तपासणी करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

















