- दोन आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात!
- ‘या आयुक्तांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय!’ घोषणांनी पालिका परिसर दणाणला..
- मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक आणि नागरिकांमध्ये वाद,..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | २ नोव्हेंबर २०२६ :- पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात आम आदमी पार्टीच्या (आप) कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. ‘या आयुक्तांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय!’ अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी दोन आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान, आंदोलनामुळे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आंदोलनादरम्यान ‘कोण आहे तो आयुक्त? बोलवा त्याला खाली’, अशा आक्रमक घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या. यामुळे महापालिका प्रशासनाविरोधातील संताप उघडपणे व्यक्त झाला.
दुसरीकडे, ‘आप’च्या आंदोलनामुळे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर नागरिकांची आणि सुरक्षारक्षकांची चांगलीच शाब्दिक चकमक झाली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना अडवण्यात आले. त्यामुळे नागरिक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वादावादी झाली.
लोकशाही आहे. ‘सर्वसामान्य नागरिकांना आत का सोडत नाही?’ असा सवाल उपस्थित करत प्रवेशद्वारावर गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र, या हस्तक्षेपामुळे वातावरण आणखी तापले.
अखेर नागरिकांच्या वाढत्या दबावाची आणि जनरेट्याची दखल घेत मुख्य प्रवेशद्वार उघडण्यात आले. त्यानंतर नागरिकांना ये-जा करण्याचा मार्ग मोकळा झाला. आंदोलन, घोषणाबाजी, पोलिसांचा हस्तक्षेप आणि प्रवेशद्वार बंद-उघडण्याच्या नाट्यमय घडामोडींमुळे महापालिका मुख्यालयात काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

















