- अजमेरा परिसरातील चिकन बिर्याणी शॉपमधील प्रकार..
- तुकाराम मुंडेंच्या विभागाकडे ग्राहक करणार तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ नोव्हेंबर २०२६) :- अजमेरा, पिंपरी (वास्तू उद्योग चौक) परिसरातील एका चिकन बिर्याणी शॉपमधून खरेदी केलेल्या बिर्याणीत चक्क किडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी (दि. २) एका वकिलाच्या मित्राने संबंधित दुकानातून चिकन बिर्याणी पार्सल घेतली होती. मात्र, घरी जाऊन पार्सल उघडल्यानंतर बिर्याणीत काहीतरी वेगळे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बारकाईने पाहिले असता त्यामध्ये किडा असल्याचे दिसून आले.
या प्रकारानंतर संबंधित ग्राहकाने तातडीने दुकानात जाऊन बिर्याणी दाखवली. दुकानचालकांनी या प्रकाराबद्दल माफी मागत बिर्याणीचे पैसे परत केले. मात्र, केवळ पैसे परत करून ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न संपत नाही. या प्रकरणी लवकरच तुकाराम मुंडे यांच्या अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित विभागाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे वकिलांनी सांगितले.
तसेच नागरिकांनीही खाद्यपदार्थ खरेदी करताना काळजी घ्यावी आणि संशयास्पद ठिकाणांहून खाद्यपदार्थ खरेदी करणे टाळावे, असे आवाहन केले आहे. संबंधित ग्राहक शक्यतो बाहेरचे खाद्यपदार्थ खात नाहीत. मात्र, दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहून त्यांनी बिर्याणी खरेदी केली होती. गर्दी म्हणजे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची आणि स्वच्छतेची हमी नसते, हे या घटनेतून समोर आले आहे.
स्वच्छतेचे नियम पाळले जातात का?..
खाद्यपदार्थ तयार करताना आणि विक्री करताना स्वच्छतेचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. बिर्याणीसारख्या खाद्यपदार्थात किडा आढळणे ही गंभीर बाब असून, अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. संबंधित दुकानातील स्वच्छता आणि अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी होत आहे.


















