- पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापनाला मिळणार गती..
- भविष्यातील शहरासाठी पायाभूत सुविधांचे नियोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ४ नोव्हेंबर २०२६) :- झपाट्याने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पुढील २५ वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा प्रक्रिया यांसारख्या मूलभूत सुविधांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी तब्बल १ हजार २४६ कोटी ५० लाख रुपयांची आर्थिक उभारणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कर्ज उभारणीचा प्रस्ताव बुधवारी (दि. ४) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
शहराची वाढती लोकसंख्या, भविष्यातील नागरीकरण आणि पायाभूत सुविधांवरील वाढता ताण लक्षात घेऊन दीर्घकालीन विकासाचा दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. त्यानुसार पवना बंदिस्त जलवाहिनी, नवीन सांडपाणी वाहिन्या, सांडपाण्याचा पुनर्वापर, आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पाणी मोजणी व्यवस्था आणि घनकचरा व्यवस्थापनासह विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
केंद्र शासनाच्या निधीची जोड; विकासकामांना आर्थिक बळ..
या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या शहरी आव्हान निधीअंतर्गत २५ टक्के निधी उपलब्ध होणार आहे. प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के निधीची उभारणी कर्ज, कर्जरोखे आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) माध्यमातून केली जाणार आहे. उर्वरित २५ टक्के म्हणजे १ हजार १८८ कोटी ९५ लाख रुपये महापालिका स्वनिधीतून खर्च करणार आहे. या माध्यमातून महापालिकेच्या आर्थिक स्रोतांचा योग्य वापर करून मोठ्या पायाभूत प्रकल्पांना गती देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
पुढील २५ वर्षांचा विचार करून विकास आराखडा..
माजी आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यकाळात प्रशासकीय मान्यता मिळालेल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विकासाचे नियोजन करण्यावर भर दिला आहे. पाणीपुरवठा, जलनिस्सारण, सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी विविध निधी स्रोतांचा विचार करण्यात आला आहे.
आर्थिक शिस्तीतून विकासाला चालना
विकासकामांसोबतच महापालिकेची आर्थिक स्थिती सक्षम ठेवण्यावरही प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. २०१९ पासून महापालिकेचे उत्पन्न वार्षिक सहा टक्क्यांनी वाढत असताना महसुली खर्चात १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यातील विकासकामे आणि कर्जफेडीसाठी आर्थिक नियोजन अधिक काटेकोर करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. महापालिकेचे उत्पन्न प्रतिवर्षी दहा टक्क्यांनी वाढविणे आणि महसुली खर्चातील वाढ आठ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामुळे भांडवली विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध ठेवण्यास मदत होणार आहे. शहराच्या भविष्यातील पाणी, स्वच्छता आणि पर्यावरणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नियोजित प्रकल्प वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण झाल्यास पिंपरी-चिंचवडच्या नागरी सुविधांना नवी दिशा मिळून शहराच्या विकासाला दीर्घकालीन बळ मिळू शकते.
शहरी आव्हान निधीतून निधी मिळवण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के निधी महापालिका उपलब्ध करणार आहे. त्यासाठी १ हजार २४६ कोटी ५० लाखांचे कर्ज उभारणार आहे. या पैशांतून पाणी, कचरा हे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले जाणार आहेत. कर्ज काढण्यासाठी दरवर्षी महापालिकेचे दहा टक्के उत्पन्न वाढणे अपेक्षित आहे.
– सत्यवान उबाळे, मुख्य लेख व वित्त अधिकारी…

















