- पोहण्यासाठी आलेल्या नागरिकाला फायटरने मारहाण..
- पिंपरीतील वाघेरे तलावातील सुरक्षा आणि प्रशासनाच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाघेरे जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाला जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून फायटरने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या जलतरण तलावातील सुरक्षितता, कर्मचारी आणि व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याप्रकरणी जयप्रकाश हरीष वासवाणी (वय ४८, रा. तपोवन मंदिर रोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयनाथ फडतरे, अक्षय भोकरे आणि जलतरण तलावातील दोन कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२० ते ७.३० च्या सुमारास वाघेरे जलतरण तलाव येथे ही घटना घडली. फिर्यादी नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी गेले असता जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच, ‘माझे टेंडर आहे, मी बघेन काय करायचे ते,’ असे सांगून त्यांना तलावातून बाहेर जाण्यास सांगितल्याचा आरोप आहे.
त्यानंतर फिर्यादी तलावाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडत असताना आरोपी क्रमांक एक याने त्यांची गचांडी धरून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील फायटरने कमरेवर, बरगडीवर, छातीवर आणि दोन्ही हातांच्या वरच्या भागावर मारहाण करून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चपटे करीत आहेत.
महापालिकेच्या मालमत्तेवर खासगी दादागिरी?..
वाघेरे जलतरण तलाव हा महापालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक जलतरण तलाव आहे. अशा सार्वजनिक सुविधेच्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे अपेक्षित आहे. मात्र, तलावाच्या प्रवेशद्वारावरच नागरिकाला मारहाण झाल्याच्या आरोपामुळे महापालिका प्रशासनाच्या देखरेख आणि नियंत्रण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. जलतरण तलावाचे टेंडर कोणाकडे आहे? संबंधित व्यक्तींना नागरिकांना तलावातून बाहेर काढण्याचा अधिकार कोणी दिला? तलावातील कर्मचाऱ्यांची भूमिका काय होती? तसेच, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने कोणती सुरक्षा व्यवस्था केली आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.


















