- अंधाऱ्या खोलीत चौघांचा हैदोस; पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ३ नोहेंबर २०२६) :-
चिखलीतील नेवाळे वस्ती परिसरात एका १८ वर्षीय तरुणाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अंधाऱ्या खोलीत नेण्यात आले. तेथे चौघांनी मिळून त्याला लाथाबुक्क्यांनी तसेच मोबाईल चार्जरच्या वायरने बेदम मारहाण केली. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील तीन हजार रुपये जबरदस्तीने लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान स्वरा ब्लॉसम इमारतीसमोरील फ्लिपकार्ट कंपनीच्या गोदामाजवळ घडली. याप्रकरणी ३ नोव्हेंबर रोजी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वेदांत लोखंडे (वय १८, रा. चिखली) हे फ्लिपकार्ट गोदामासमोर असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या दुचाकीची चावी जबरदस्तीने काढून घेतली आणि होंडा अॅक्टिव्हावर बसवून अंगणवाडी चौक परिसरातील एका अंधाऱ्या पत्र्याच्या खोलीत नेले.
तेथे आणखी दोघे साथीदार आले. चौघांनी मिळून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मोबाईल चार्जरच्या वायरने पाठीवर मारले, तर बिअरच्या बाटलीने डाव्या पायाच्या पोटरीवर वार करून जखमी केले.
दरम्यान, दोघांनी कमरेला लावलेले कोयते बाहेर काढून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पँटच्या खिशातील ५०० रुपयांच्या तीन नोटा, २०० रुपयांची एक नोट आणि १०० रुपयांच्या १३ नोटा असे एकूण तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
‘पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुला मारून टाकू’, अशी धमकीही आरोपींनी दिली. तसेच आम्ही इथले भाई आहोत, आमचा नाद करायचा नाही, असे ओरडून परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे ये-जा करणारे नागरिकही तेथून निघून गेले.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मासाळ करीत आहेत.

















