- बिल्डरची सोसायटीविरोधात तक्रार..
- रविराज काळे यांच्या पाठपुराव्याला यश..
- हक्काचा रस्ता खुला करण्यासाठी ‘आप’चा लढा सुरूच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ३ नोहेंबर २०२६) :- बालेवाडी येथील ‘४३ प्रायव्हेट ड्राईव्ह’ गृहप्रकल्पातील म्हाडा सोडतीद्वारे घरे मिळालेल्या नागरिकांना अंतर्गत रस्त्याचा वापर करण्यापासून रोखले जात असल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. आम आदमी पार्टीने केलेल्या आक्रमक पाठपुराव्यानंतर बांधकाम व्यावसायिक मे. एस. एस. प्रॉपर्टीजचे सचिन भंडारी यांनी म्हाडा सदनिकाधारकांसोबत पुढाकार घेत सोसायटी कमिटीविरोधात बालेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या गृहप्रकल्पातील म्हाडा सदनिकाधारकांना सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारातून तसेच अंतर्गत रस्त्यावरून जाण्यास सोसायटी पदाधिकारी आणि सुरक्षारक्षकांकडून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप आहे. या अन्यायाविरोधात आम आदमी पार्टी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज बबन काळे यांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली होती. संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि आर्किटेक्टवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती.
दरम्यान, सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांनी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशात म्हाडा सदनिकाधारकांना सामायिक रस्ते आणि सुविधांचा वापर करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक आणि म्हाडा धारकांनी संयुक्तपणे पोलिसांकडे धाव घेत सोसायटी कमिटीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
“सामान्य आणि गरीब म्हाडा धारकांवर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. आमच्या पाठपुराव्यामुळे आज बिल्डरलाही पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे लागले आहे. म्हाडा धारकांना त्यांचा हक्काचा रस्ता प्रत्यक्षात खुला होईपर्यंत आणि रस्ता अडवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत आम आदमी पार्टीचा लढा सुरूच राहील,” असा इशारा रविराज बबन काळे यांनी दिला.

















