न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. ०९ नोव्हेंबर २०२६) :- आळंदी येथील एमआयटी बी.एड. महाविद्यालयात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘हरित दीपोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदूषणमुक्त दिवाळी, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष बी.एड.च्या विद्यार्थिनी सरगम राजपूत आणि ज्योती खत्री यांनी केले. प्रा. स्वरांजली सातव यांनी प्रास्ताविकात पर्यावरणपूरक दिवाळीचे महत्त्व सांगितले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. समाधान निकुंभ होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जपण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात दीपप्रज्वलन, आकर्षक पणती सजावट, नृत्य सादरीकरण आणि पर्यावरण जनजागृतीपर नाटिका सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणाचा संदेश दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, संघभावना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळाले. शेवटी मोनाली खंडागळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्राचार्य, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

















