- वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नगरसेविका अनिता काटे यांचे आयुक्तांना निवेदन..
- तांत्रिक सर्वेक्षण व निधीची तरतूद करण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ नोव्हेंबर २०२६) :- पिंपळे सौदागर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जगताप डेअरी चौकात प्रस्तावित असलेला ग्रेड सेपरेटर शिवार चौकापर्यंत विस्तारित करावा, अशी मागणी नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन तांत्रिक सर्वेक्षण आणि व्यवहार्यता तपासणी करण्याची मागणी केली आहे.
पिंपळे सौदागरमधील शिवार चौक हा अत्यंत वर्दळीचा परिसर असून वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येमुळे येथे विशेषतः सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
जगताप डेअरी चौकातील प्रस्तावित ग्रेड सेपरेटरला जोडून शिवार चौकापर्यंत सुविधा निर्माण केल्यास संपूर्ण मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. वाहनचालकांचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यासह प्रवास अधिक सुरक्षित व जलद होईल, असे काटे यांनी पत्रात नमूद केले आहे.
या कामासाठी आवश्यक वाहतूक अभ्यास, तांत्रिक सर्वेक्षण व व्यवहार्यता तपासणी करून विकास आराखड्यात कामाचा समावेश करावा. तसेच आवश्यक निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. केवळ एका चौकापुरता विचार न करता जगताप डेअरी ते शिवार चौक या संपूर्ण मार्गाचे एकात्मिक वाहतूक नियोजन करावे, अशी भूमिका अनिता काटे यांनी मांडली आहे.


















