- १० जानेवारीला मॅरेथॉनचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ नोव्हेंबर २०२६) :- औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडला जागतिक क्रीडा नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी १० जानेवारी २०२७ रोजी ‘पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ४२ किलोमीटर फुल मॅरेथॉन, २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० आणि ५ किलोमीटर अशा चार गटांचा समावेश आहे. शहरात आरोग्य व फिटनेसविषयी जागरूकता निर्माण करण्यासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय धावपटूंना व्यासपीठ देण्याचा उद्देश असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
मॅरेथॉनचे नियोजन आंतरराष्ट्रीय मानकांनुसार केले जाणार असून, स्पर्धेचा जागतिक मॅरेथॉन कॅलेंडरमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याबाबत महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मॅरेथॉनचा मार्ग डी. वाय. पाटील मैदानापासून सुरू होऊन भक्ती-शक्ती चौक, टेल्को रोड, इंद्रायणीनगर, एम्पायर इस्टेट, काळेवाडी, डांगे चौक, रावेतमार्गे पुन्हा मैदानावर समाप्त होणार आहे. इच्छुक धावपटूंना indiarunning.com येथे नोंदणी करता येणार आहे.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

















