- स्थायी समितीची मंजुरी; सभापती अभिषेक बारणे यांची माहिती
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ नोहेंबर २०२६) :- भारतीय संविधानाचा सन्मान, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि युवा पिढीमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य ‘संविधान सन्मान दौड-२०२६’ला महापालिकेच्या स्थायी समितीने सर्वानुमते मंजुरी दिली आहे. या दौडीच्या आयोजनासाठी १५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून, संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी एकूण ३९ लाख रुपयांची आर्थिक तरतूद मंजूर करण्यात आली आहे. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून शहरात पहिल्यांदाच भव्य ‘संविधान सन्मान दौड’ आयोजित करण्याची संकल्पना महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे सदस्य तथा नगरसेवक डॉ. सुहास लक्ष्मण कांबळे यांनी मांडली होती. आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या उपक्रमासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. लेखी पत्राद्वारे या उपक्रमाचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या उपस्थितीत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यामुळे संविधान सन्मान दौडीच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यापुढे दरवर्षी ही भव्य संविधान सन्मान दौड आयोजित केली जाईल, असा संकल्प यावेळी करण्यात आला.
दहा किलोमीटरची भव्य दौड!
प्रस्तावित ‘संविधान सन्मान दौड-२०२६’ साधारण दहा किलोमीटर अंतराची असणार आहे. या उपक्रमात शहरातील शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट, क्रीडा संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. हजारो नागरिकांना या दौडमध्ये सहभागी करून घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
ही दौड केवळ क्रीडा स्पर्धा न राहता भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये जनमानसात रुजवणारी लोकचळवळ ठरावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन!
२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये, लोकशाही व्यवस्था तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.
स्थायी समितीने दिलेल्या ३९ लाख रुपयांच्या मंजुरीमुळे या उपक्रमांना आर्थिक पाठबळ मिळाले असून, शहरात संविधान दिन व्यापक लोकसहभागातून साजरा करण्याच्या दृष्टीने महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
लोकशाही मूल्यांचा जागर, संविधानाप्रती आदर आणि सामाजिक समतेचा विचार नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संविधान दिनानिमित्त शहरात व्यापक स्वरूपात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ३९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये संविधान सन्मान दौडीसाठी स्वतंत्रपणे १५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन संविधान दिन उत्साहात आणि जनजागृतीच्या माध्यमातून साजरा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे.
– अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती

















