- रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा आणि अतिक्रमणांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा आढावा..
- कामांसाठी कालमर्यादा निश्चित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १९ नोव्हेंबर २०२६) :- चाकण-तळेगाव आणि हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने सोडवून विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात (दि. १९) झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या स्वतंत्र बैठकांमध्ये रस्ते, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, अतिक्रमणे आणि कचरा व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार बाबाजी काळे उपस्थित होते.
चाकण-तळेगाव परिसरातील ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटवून पावसाळ्यापूर्वी पाणी निचऱ्याचे मार्ग मोकळे करण्याचे निर्देश देण्यात आले. रस्त्यांच्या कामांच्या निविदा नोव्हेंबरमध्ये काढून डिसेंबरअखेर कामे सुरू करण्याचे नियोजन आहे. अवजड वाहनांची बेशिस्त पार्किंग रोखणे, सार्वजनिक वाहतूक वाढविणे आणि प्लास्टिक कचरा संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यावरही भर देण्यात आला.
दरम्यान, हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील सुमारे ४५० कोटींच्या रस्ते विकासकामांचे डीपीआर नोव्हेंबरअखेर अंतिम करण्याचे निर्देश दिले. २५ नोव्हेंबरपर्यंत निविदा प्रसिद्ध करून २० डिसेंबरपर्यंत कामे सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. पाणीपुरवठा, एसटीपी प्रकल्प, ड्रेनेज, कचरा जाळणे आणि प्रदूषण रोखण्यासाठीही कठोर उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. विकासकामांत दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

















