- ‘मालपाणी पुणे महापालिकेचे जावई आहेत का?’
- रविराज काळे यांचा सवाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १९ नोव्हेंबर २०२६) :- बाणेर येथील मालपाणी बांधकाम प्रकल्पासाठी विनापरवाना रस्ता खोदाई केल्याप्रकरणी पुणे महापालिकेने ४ कोटी ३८ लाख ९१ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला असतानाही संबंधित प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र (OC) दिल्याचा आरोप आम आदमी पार्टी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी केला आहे. ‘मालपाणी बांधकाम व्यावसायिक पुणे महापालिकेचे जावई आहेत का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मे. एम. रामानुसन मालपाणी यांनी १२०० मीटर रस्त्याची विनापरवाना खोदाई केल्याप्रकरणी दोन टप्प्यांत दंड आकारण्यात आला होता. दंड भरल्याशिवाय परवानगी देऊ नये, असे पथ विभागाने १६ मे २०२५ रोजी स्पष्ट केले होते. तसेच अतिरिक्त १०० मीटर खोदाईचा दंडही प्रलंबित असल्याचा दावा काळे यांनी केला.
थकीत दंड व्याजासह वसूल करावा, भोगवटा प्रमाणपत्र रद्द करावे आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबन करावे, अशी मागणी त्यांनी केली. कारवाई न झाल्यास महापालिका मुख्यालयावर आंदोलन करण्याचा इशाराही दिला.


















