- भूसंपादन पूर्ण; ३६ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड : पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड (राजगुरुनगर) या २९.९२ किलोमीटरच्या आठपदरी उन्नत मार्गाच्या प्रकल्पातील भूसंपादन पूर्ण झाले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) आवश्यक संपूर्ण जमिनीचा कागदोपत्री ताबा मिळाला असून, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कंत्राट मंजुरीचे ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ जारी करण्यात आले आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
या प्रकल्पासाठी यापूर्वी ९३ टक्के जमीन उपलब्ध होती. प्रवेश आणि निर्गमन रॅम्पसाठी आवश्यक उर्वरित १०.६९ हेक्टर जमिनीचे संपादनही पूर्ण झाले आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जमिनीचा ताबा एनएचएआयकडे सुपूर्द केला आहे.
या उन्नत मार्गामध्ये नऊ प्रमुख जंक्शन, दोन मोठे पूल आणि दोन्ही बाजूंना सेवा रस्त्यांचा समावेश आहे. भोसरी-चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी कमी होऊन कामगार आणि मालवाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
एनएचएआयकडून काम सुरू करण्याची अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल. त्या तारखेपासून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.


















