- विविध मागण्यांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यभर आंदोलन..
- मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा बेमुदत संपाचा इशारा – डॉ. बाबा कांबळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ नोव्हेंबर २०२६) :- महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष तथा गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे (उर्फ माऊली) यांच्या नेतृत्वाखाली आणि वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेला रिक्षा-टॅक्सी संप आणि आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या संपाला पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातून १०० टक्के कडकडीत प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेने म्हटले आहे.
पिंपरी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी रिक्षा आणि टॅक्सी चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चालकांनी स्वयंस्फूर्तीने रिक्षा बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे म्हणाले की, केंद्रीय मंत्र्यांनी २० कोटी टॅक्सी आणण्याबाबत केलेली घोषणा आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केलेल्या बाईक टॅक्सी सेवेसंदर्भात परिवहन मंत्र्यांनी घेतलेली भूमिका यामुळे पारंपरिक रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या निर्णयांविरोधात चालकांमध्ये असलेला रोष संपाच्या माध्यमातून व्यक्त झाला. सर्व कष्टकरी चालकांनी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
या आहेत प्रमुख मागण्या…
रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी संघटनेने विविध मागण्या मांडल्या आहेत. राज्यातील बेकायदेशीर दुचाकी टॅक्सी सेवा तात्काळ आणि कायमस्वरूपी बंद करावी. केंद्रीय मंत्र्यांनी २० कोटी टॅक्सी आणण्याबाबत केलेली घोषणा रद्द करावी. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी बाईक टॅक्सीविरोधात केलेल्या कारवाईत परिवहन मंत्र्यांनी हस्तक्षेप करू नये, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी जाहीर झालेल्या कल्याणकारी महामंडळाची प्रभावी अंमलबजावणी करावी, प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) आणि तपासणी केंद्रांमधील भ्रष्टाचाराला आळा घालावा, ऑनलाइन ॲप आधारित कंपन्यांचे प्रवासी भाडेदर शासनाच्या नियमानुसार निश्चित करावेत, तसेच पारंपरिक रिक्षा आणि टॅक्सी व्यवसायाला शासनाचे संरक्षण देऊन योग्य भाडेदर लागू करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा…
शासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्यांची पूर्तता न केल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा डॉ. बाबा कांबळे यांनी दिला. यासाठी २३ नोव्हेंबर रोजी रात्री पुणे, पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विविध संघटनांची ऑनलाइन बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत बेमुदत संपाबाबत निर्णय जाहीर केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संपाला विरोध करणाऱ्या संघटनांनाही डॉ. कांबळे यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. विरोध करणाऱ्या संघटनांमधील पदाधिकारीही आपलेच बांधव असून, कष्टकरी चालकांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यावा. यासाठी आपण स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनाच्या यशस्वितेसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग…
या संप आणि आंदोलनाच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेडच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामध्ये शुभम तांदळे (महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष), अनिल शिरसाट (रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रमुख), बाबू शेख (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), आनंद सदावर्ते (लोणावळा शहराध्यक्ष), लखन लोंढे (राज्य संघटक सचिव), उबाळे साहेब (अध्यक्ष, कार्ला शहर), धनंजय कुदळे (महाराष्ट्र राज्य प्रवक्ता), अशोक ठाकूर (जिल्हा ग्रामीण अध्यक्ष), सुरज सोनवणे (जिल्हा उपाध्यक्ष), खलील मकानदार (पुणे जिल्हा उपाध्यक्ष), सिद्धार्थ साबळे (पुणे जिल्हा सह-कार्याध्यक्ष), नंदू शेळके (सचिव व संपर्कप्रमुख), विजय ढगारे (पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष), प्रदीप अय्यर (विद्यार्थी वाहतूक शहराध्यक्ष), अपरोज कोतवाल (पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष), किशोर कांबळे (पिंपरी-चिंचवड रिक्षा ब्रिगेड कार्याध्यक्ष), भाऊसाहेब शेलार (युवक उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर), उमाकांत शिंदे (भुमकर चौक विभागीय अध्यक्ष), दत्ता गिल्ले (संघटक, महाराष्ट्र रिक्षा पंचायत), मोहम्मद शेख (पुणे शहर अध्यक्ष), विलास केमसे (पुणे शहर कार्याध्यक्ष), संजय शिंदे (वरिष्ठ उपाध्यक्ष, पुणे शहर), निशांत भोंडवे (सहसचिव, पुणे शहर), प्रवीण शिखरे (उपाध्यक्ष, पुणे शहर), फ्रान्सिस अँथोनी (संघटक, पुणे शहर), गणेश कांबळे (पुणे स्टेशन अध्यक्ष), रमेश इंगळे (पुणे स्टेशन उपाध्यक्ष), अमीर हमजा (पुणे शहर उपाध्यक्ष), मल्लेश कांबळे (मुंढवा विभाग अध्यक्ष) आणि अल्ला बकस शेख (पुणे शहर सह-खजिनदार) यांचा समावेश होता.
तसेच गणेश कुटे, हेमंत शिंदे, नरसिंग गायकवाड, चंद्रकांत कणके, गणेश गावडे, गोपी अवचारे, निलेश पोपळघट, नवनाथ सोलनकर, संतोष खराडे, अविनाश उपाध्ये, अभिजीत खलसे, सोमनाथ शिंदे, बालाजी गायकवाड आणि संभाजी सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.

















