- स्थानिक नगरसेवकांसह अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २५ नोव्हेंबर २०२६) :- कोकणे चौक ते काळेवाडी फाटा या प्रमुख मार्गावरील रखडलेल्या रस्त्याच्या कामाला लवकरच गती मिळणार असून, हे काम पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. नगरसेविका अनिताताई संदीप काटे यांनी या कामाबाबत माहिती देताना लवकरच रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या रस्त्याच्या रखडलेल्या कामाची नुकतीच प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्यात आली. यावेळी रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणींची माहिती घेण्यात आली. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन काम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका कुंदा भिसे आणि स्वि. नगरसेवक जयनाथ काटे यांनी महापालिकेचे नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे व सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांच्यासमवेत संयुक्त पाहणी दौरा केला.
यावेळी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून कामातील अडथळे दूर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कोकणे चौक ते काळेवाडी फाटा हा महत्त्वाचा मार्ग नागरिकांसाठी वाहतुकीस खुला होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि नियमित प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

















