- वृक्ष प्राधिकरण विभागाच्या नोटिशीनंतर नागरिकांमध्ये चर्चेला उधाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी-प्राधिकरण (दि. २५ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी-प्राधिकरण परिसरातील दुर्गादेवी टेकडीवरील झाडांचा विषय आता चर्चेत आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने झाडे तोडणे व पुनर्रोपण करण्यासंदर्भात सार्वजनिक जाहिर नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर दुर्गादेवी टेकडी परिसरातील काही झाडांच्या खोडांवर पांढऱ्या रंगाच्या कागदी पट्ट्या चिकटवण्यात आल्याचे समोर आले आहे.
टेकडीवरील झाडांवर अशा प्रकारे पट्ट्या लावण्यात आल्याने या झाडांवर नेमकी कोणती कारवाई प्रस्तावित आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही झाडे तोडण्यासाठी चिन्हांकित केली आहेत की पुनर्रोपणासाठी, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. यापूर्वीही दुर्गादेवी टेकडीच्या अप्पूघर परिसरातील वृक्षतोडीचा विषय चर्चेत आला होता.
दुर्गादेवी टेकडी ही शहरातील महत्त्वाची हरित जागा असून येथे मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आहे. त्यामुळे टेकडीवरील झाडांबाबत कोणताही निर्णय घेताना पर्यावरणाचा विचार करून पारदर्शक प्रक्रिया राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान याबाबत अधिक माहितीसाठी मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

















