न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज दुपारी २.३० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शहरातील विविध भागांतील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, अग्निशमन यंत्रणा, आरोग्य सुविधा आणि उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीशी संबंधित विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
बैठकीत ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कावेरी नगर टाकी व बायपास जलक्षेत्रातील पाणी वितरण व्यवस्थेचे परिचालन, देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामास मान्यता देण्यात आली. तसेच गवळीनगर, दिघी, चऱ्होली, भोसरी, थेरगाव, चिंचेचा मळा, कासारवाडी, रावेत, किवळे, मामुर्डी आदी परिसरांतील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण, स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्ती, ड्रेनेज लाईन व चेंबर्सची दुरुस्ती तसेच पावसाळी गटारांची साफसफाई करण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक शौचालये व मुताऱ्यांची दैनंदिन साफसफाई आणि देखभाल, रस्ते व गटर्सची साफसफाई, नालेसफाई, बांधकामाचा राडारोडा उचलणे तसेच अतिक्रमण कारवाईसाठी आवश्यक मशिनरी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांना मुदतवाढ देण्यासही मंजुरी देण्यात आली. याशिवाय महापालिका हद्दीतील आरोग्य कर्मचारी, त्यांची कुटुंबे, लहान मुले आणि युवा वर्ग तसेच सार्वजनिक शौचालयांच्या सर्वेक्षणासाठी ३८ सर्वेक्षणकर्त्यांच्या नियुक्तीला कार्योत्तर मान्यता देण्यात आली. त्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यासही मंजुरी देण्यात आली.
अग्निशमन विभागाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन केंद्रांवर व्हीएचएफ वॉकीटॉकी आणि पीओसी वॉकीटॉकी यंत्रणा पुरविणे तसेच वायरलेस यंत्रणेत सुधारणा करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. शहरातील विविध रस्त्यांवरील पावसाळी गटारांची साफसफाई, विद्युत दाहिनीचे परिचालन व देखभाल-दुरुस्ती तसेच मोरवाडी आयटीआय इमारतीसाठी लिफ्ट उभारण्याच्या कामांनाही मान्यता देण्यात आली.
शहरातील विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि क्रीडा कार्यक्रमांच्या आयोजनासाठी तात्पुरती प्रकाश व्यवस्था, ध्वनिक्षेपण यंत्रणा, जनरेटर आणि सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये मोशी खाण परिसरातील कार्यक्रम, श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा, महापौर चषक, राज्यस्तरीय क्रीडा कार्यक्रम तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील व्यवस्थांचा समावेश आहे.
तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने चिंचवड येथील ६ हजार चौरस मीटर आणि पुनावळे येथील ७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ऑक्सिजन पार्क उद्यानांची केअरटेकरसह देखभाल करण्याचे काम १८ महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यास मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या विविध कार्यक्रमांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी फ्लेक्स आणि बॅनर्सची छपाई व पुरवठा करण्याच्या कामास मुदतवाढ देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. तसेच वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढी विभागातील ब्लास्ट फ्रीझर उपकरणाच्या आठ वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी वार्षिक देखभाल करारास (सीएमसी) मान्यता देण्यात आली.
स्थायी समितीच्या या बैठकीत शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, अग्निशमन व्यवस्था आणि नागरी सुविधांशी संबंधित विविध कामांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयांमुळे शहरातील विविध विकासकामे आणि नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

















