- खासगी जागा वाटाघाटीचा निर्णय कालबाह्य
- पवारांनी अकलेचे तारे तोडू नयेत; राष्ट्रवादी कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांचा टोला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिका विकास प्रकल्पांसाठी खासगी जागा ताब्यात घेताना भिकेकंगाल होईल. शहरातील प्रामाणिक करदात्यांना मुलभूत सोयी सुविधाही पुरविता येणार नाहीत. त्यासाठी खासगी जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात भरपाई देण्याच्या नियमाचा गैरवापर काही जण करीत असून, कायद्यातील नियमांचा गैरफायदा घेत आहेत. अशा महापालिकेच्या खासगी जागा ताब्यात घेतलेल्या प्रकरणांची व अशा प्रकरणांत नगरसेवकांचा सहभाग किंवा समावेश असल्यास त्यांच्यावरही महापालिकेची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच आजी व माजी नगरसेवक व त्यांच्या नातेवाईकांच्या मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. मात्र, शहरातील अनधिकृत बांधकामाचं नियमितीकरणाचं, त्यावर आकारण्यात येणाऱ्या शास्तीकराचं भूत शहरवासीयांच्या मानगुटीवर बसलेलं असतानाही, पक्षनेते पवार यांचा कळवळा केवळ महापालिकेच्या खासगी जागा वाटाघाटीपुरताच मर्यादित आहे? मुळातंच या प्रश्नांचं कोणतंही सोयरं-सुतक नसलेले एकनाथ पवार कोणाच्या तरी इशाऱ्यावरून बोलका पोपट होऊ पाहत आहेत, हे न समजण्यापुरती जनता काही खुळी नाही, असा आरोप राष्ट्रवादी कार्यकर्ते ज्ञानेश्वर संपत कस्पटे यांनी एकनाथ पवार यांच्यावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
कस्पटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पांसाठी खासगी जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात भरपाई घेण्याच्या नियमात गैरवापर सुरु आहे. त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आयुक्तांना केली आहे. त्यांनी म्हंटल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महपालिकेच्या विकास प्रकल्पांसाठी खासगी जागा ताब्यात घेत असताना ३ गुंठ्यापर्यंत बाजारभावाच्या दुप्पट मोबदला द्यायचा ठरला असून, ३ गुंठ्यापुढील क्षेत्रास ३० टक्के दिलासा देण्याचा निर्णय घेतला. ३ गुंठ्यापर्यंत दुप्पट मोबदला देण्याच्या निर्णयाचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना फायदा व्हावा, हा त्या मागचा उद्देश होता. ज्या सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांनी स्वतःच्या घामातून कमावलेल्या मिळकतीवर राहण्यासाठी घरे बांधली, त्या घरांना नियमित करण्यासाठी असणाऱ्या जाचक अटी व शास्तीबाबत कोणतेही पाउल न उचलणारे जनतेचे कैवारी म्हणून मिरवणारे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार डोळेझाकपणा का करतात? असेही कस्पटे यांनी म्हटले.
तसेच ३ – ३ गुंठ्यांचे तुकडे करून बाजारभावापेक्षा दुप्पट रोख रक्कम घेऊन महापालिकेला आर्थिक संकटात आणायचे आणि संकटात आल्यानंतर मुलभूत सोयी सुविधा पुरविता येणार नाहीत, ही बाब जनतेसमोर येऊ नये हा विरोधी पक्षाचा डाव आहे, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी म्हटले आहे. परंतु, माझ्या माहितीप्रमाणे सदर ३ गुंठ्यापर्यंत दुप्पट मोबदला देण्याचा निर्णय झाला. हा तो घेतलेल्या निर्णयाच्या मर्यादित कालावधीपुरताच लागू होतो व ज्यांचे क्षेत्र ३ गुंठे आहे त्यांच्यापुरातच मर्यादित आहे. त्यानंतर किती जरी तुकडे झाले तरी, सदर निर्णय कायदेशीरदृष्ट्या लागू होत नाही. त्यामुळे यामध्ये कुठेही महापालिकेचे नुकसान होताना दिसून येत नाही, असेही कस्पटे यांनी म्हटले आहे.
एकीकडे ५०० चौरस फुटापर्यंत बांधकामांना मिळकतकरामधून सवलत देण्याच्या बातम्या प्रसार माध्यमामधून प्रसारित होत आहेत. ज्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोतच आटणार आहे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या सूक्ष्म निरीक्षणाअभावी महापालिकेचे आज प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. त्याबाबत कोणताही खुलासा न करता सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार मूग गिळून गप्प आहेत. महापालिका सभेत कचरा शुल्क आकरण्याबाबत ठराव मंजूर होत असताना पक्षनेत्यांना गोरगरिबांची आठवण का नाही आली? मुळात पवार यांनी कोणाच्यातरी सांगण्यावरून आपल्या अकलेचे तारे तोडू नयेत व अनाठायी बातम्या देऊन जनतेची दिशाभूलही करू नये, असे कस्पटे यांनी या पत्रकात म्हटले आहे.


















