- सत्ताधारी भाजपची श्रेयवादाची खेळी असल्याचा जाणकारांचा अंदाज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२०) :- पिपरी-चिंचवड महापालिकेची डिसेंबर महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे या होत्या.
शहरातील २००० हजार चौरस फुटापुढील अवैध बांधकामांचा १०० टक्के शास्तीकर माफ करण्यात यावा. तसेच महापालिका हद्दीतील आणि यापुढे नव्याने आकारणी होणा-या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना १ एप्रिल २०२० पासून मालमत्ता कर माफ करण्यात यावा. या प्रस्तावास राज्य सरकारची मान्यता घ्यावी, अशी उपसूचना सत्ताधारी भाजपने मंजूर केली आहे.
दरम्यान, उपसूचना विसंगत असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला. राज्यात भाजपची सत्ता असताना प्रस्ताव का आणला नाही? असा सवालही उपस्थित केला. सदर प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केला तरी भाजप सुपात, अन नाही केला तरी, सुपातच राहणार, अशी ही सत्ताधारी भाजपची श्रेयवादाची खेळी असल्याचा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.












