न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ फेब्रुवारी २०२०) :- घराजवळील सार्वजनिक स्वच्छतागृहालगतच्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याने त्यात पडून ८० वर्षीय वृद्धेचा मृत्यु झाल्याप्रकरणी संबंधित घटनेला जबाबदार अधिका-यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अॅड. सागर रतन चरण यांनी याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. १ फेब्रुवारी २०२० रोजी हुक्मो धुलीराम बिडलान (वय ८०, रा. रामनगर, बोपखेल) या वृद्धेचा महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहालगत असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून मृत्यु झाला. या स्वच्छतागृहाच्या पाण्याच्य टाकीचे झाकण उघडे असल्याने हुक्मो यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. टाकीचे झाकण बंदीस्त असते, तर ही दुर्घटना घडली नसती. त्यामुळे या घटनेला जबाबदार असणा-या संबंधित अधिका-यांवर तात्काळ प्रचलित कायदा अनुसार कारवाई करावी.
या कुटूंबाची संपूर्ण जबाबदारी हुक्मो यांच्यावर होती. त्यामुळे त्यांच्या वारसाला महापालिका सेवेत घेण्यात यावे. तसेच या कुटूंबाला आर्थिक मदत करावी, असे अॅड. सागर चरण यांनी निवेदनात म्हटले आहे.