- प्रतिभा महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ संपन्न
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ फेब्रुवारी २०२०) :- चिंचवड येथील कमला शिक्षण संस्था संचालित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड कॉम्प्युटर स्टडीज आणि प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या बी.कॉम, बी.एस्सी., बी.बी.ए., बी.एड. पदवी परिक्षेत विशेष गुण मिळविलेल्या सुमारे ४७ विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ व्यावसायिक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा, प्राचार्य बाबसाहेब सांगळे, डॉ. पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, डॉ. जयश्री मुळे आदि उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना कृष्णकुमार गोयल पुढे म्हणाले, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना जे आत्मसात केले जाते ते परिक्षांच्या माध्यमातून मिळालेल्या गुणातून दिसून येते. पदवी घेतली, पुढे काय? याचा विचार अनेक जण करताना आढळून येत नाही ते इतरांवर अवलंबून असतात परंतू चार ते पाच टक्के विद्यार्थी सुरवातीपासूनच ध्येय डोळ्यासमोर ठेवतात. भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्न पहा त्यासाठी इच्छाशक्ती, कष्टाची तयारी ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जसा विचार कराल तसे घडेल त्यातूनच आत्मविश्वासही वाढत जातो. मोबाईल मुळे जग हातात आहे. त्याचा योग्य वापर केला तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. सध्याचा काळ स्पर्धेचा असून यशस्वी होण्यासाठी विविध भाषेवर प्रभुत्व मिळवा. कोणताही व्यवसाय करणे सोपे नसून त्यासाठी जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा अंगीकारले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपल्या आईवडीलांची स्वप्न पूर्ण करताना शिक्षण घेत असलेली संस्था, प्राध्यापक व मित्रांना विसरू नका. सामाजिक उत्तरदायित्व जोपासा असेही आवाहन केले.
संस्थेचे सचिव डॉ. दिपक शहा म्हणाले, आज पदवी घेताना जो आनंद व उत्साह आहे, त्याचबरोबर तुमच्या मनात अनेक स्वप्ने आहेत. या महाविद्यालयात सोनेरी आयुष्य जगलात, आता पुढे जगात माझे काय स्थान आहे, ते निर्माण करण्यासाठी तूमच्या प्रत्येकांच्या मनात वेगळ्या वाटेवर जावून आपली कल्पना साकार करण्याची उर्जा तुमच्यात असली पाहिजे. लक्षात ठेवा रूळलेल्या वाट सोडून वेगळा विचार करणाराच यशस्वी होतो. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचे विश्व् तयार करण्याचे स्वप्न उराशी बाळगा.
प्राचार्य डॉ.बाबासाहेब सांगळे आपल्या मनोगतात म्हणाले, येथील शिक्षण संस्था महाविद्यालयातील मुलांचे प्रोत्साहन वाढविणे, त्याची कार्यक्षमता वाढविणे यात प्रतिभा महाविद्यालयाचा हातखंडा आहे.तुम्ही मैत्री जोपासा त्यात श्रीमंती गरिबी महत्वाची नसते, शिक्षणानेच माणूस घडतो. नवनिर्माण तंत्रज्ञान आत्मसात करा, खर्या जगात स्वतःला सिध्द करायचे आहे. ज्ञान नसेल तर आजच्या बेरोजगारात भर घालणार आहात याची जाणिव सतत ठेवा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा गोगटे यांनी केले. पदवी प्रमाणपत्र वितरणाचे वाचन डॉ. श्रृती गणपुले व डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी तर आभार डॉ. जयश्री मुळे यांनी मानले.