न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२०) :- स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी यांच्यासह आठ सदस्यांचा कार्यकाळ येत्या २९ फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे भाजपचे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नवीन सदस्यांना स्थायीमध्ये संधी मिळणार आहे. या आठ सदस्यांच्या नियुक्तीचा फैसला आज ( बुधवार ) महापालिकेच्या महासभेत होणार आहे.
स्थायी समितीचे सदस्यपद कोणाला मिळणार याबाबतची पक्षाकडून आलेली नावे महापौर जाहीर करणार आहेत. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. तर तीन वर्षामध्ये एकही पद न मिळालेल्या भाजपाच्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. नेहमीच पदापासून वंचित राहिलेल्या नगरसेवकांना आता तरी संधी मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
ज्या सदस्यांना तीन वर्षामध्ये एकही पद मिळाले नाही, ते स्थायीच्या सदस्यपदाकडे डोळे लावून बसले आहेत. स्थायी समितीच्या सदस्यपदासाठी आमदारांच्या मर्जीतील नावे न आल्यामुळेच २० फेब्रुवारीची महासभा तहकूब करण्याचे राजकारण भाजपने केले होते. भाजप व राष्ट्रवादीच्या उर्वरित नगरसेवकांपैकी कुणाला स्थायीचे पद मिळणार याचा फैसला आज महासभेत होणार आहे.















