न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२०) :- नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी साई चौक येथे सुरू असलेल्या पिंपळे सौदागर ते वाकड या भुयारी मार्गाच्या कामाची मंगळवारी पाहणी केली. साई चौक हा मुख्य रहदारी तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक दळणवळण असलेल्या परिसरातील चौक आहे. परंतु; या परिसरामध्ये वाहतूकविषयक समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती. नागरिकांना सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे बीआरटी यांच्यामार्फत साई चौक येथे भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असून येत्या दोन आठवड्यामध्ये वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याचे नगरसेवक काटे यांनी सांगितले.
या भुयारी मार्गामुळे या परिसरामध्ये आय . टी . कंपनी हिंजवडी हबमध्ये काम करणारा मोठा वर्ग व रहिवाशांना सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या भुयारीमार्गामुळे हिंजवडीला जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीसाठी सत्तर टक्के मार्ग मोकळा ( ट्रॅफिक फ्री ) मिळणार आहे. या भुयारी मार्गामुळे विशालनगर, वाकड, हिंजवडीकडे जाण्यास अत्यंत उपयुक्त आणि सोयीस्कर झाला असून या परिसरातील वाहतूक कोंडीचा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.















