न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२०) :- पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाने थैमान घातले असून शनिवारी रात्री उशिरा पाच जण बाधित असल्याचे समोर आले आहे. यात तीन महिला आणि दोन पुरुष आहेत अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगर पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड चा आकडा वाढला असून पाच जणांची भर पडली आहे. एकूण १५ जणांना कोरोना ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बधितांची संख्या ही आता ८ वर पोहचली असून पुण्याचे ७ जण पॉझिटिव्ह आहेत. यातील ३ जण यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात तर ५ जण भोसरी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना बाधित देशातून पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या ३१ जणांची माहिती प्रशासनाकडे आहे. या लोकांच्या कुटुंबातील आणखी संशयित ४१ जणांचे नमुने एनआयव्ही कडे शुक्रवारी पाठवण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांचे रिपोर्ट शनिवारी रात्री पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली असून, संबंधित रुग्णांना भोसरी येथील रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली .
पुण्यातील दुबईहून आलेला पहिल्या ग्रुपमध्ये असलेल्या ४० जणांपैकी ४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एक जण थायलंडहुन पिंपरी-चिंचवडला आला आहे. तो पॉझिटिव्ह निघाला असून या सर्वांवर पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.















