न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून जलद प्रतिसाद पथकांची स्थापना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आली असून या पथकाने विचारलेली माहिती देऊन त्यांनी सांगितलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि देशांतर्गत करोना या विषाणूचे संसर्ग बाधीत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता जलद प्रतिसाद पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकामध्ये नियुक्त केलेल्या कर्मचा-यांचे प्रशिक्षण आज चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे घेण्यात आले. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरूमणी, डॉ. शैलजा भावसार, डॉ. विजया आंबेडकर, शिक्षण मंडळाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंढे आदि उपस्थित होते.
ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे या पथकाला प्रशिक्षण दिले. या पथकाने कशा पद्धतीने काम केले पाहिजे याची माहिती प्रशिक्षणामध्ये देण्यात आली. स्थापन करण्यात आलेल्या जलद प्रतिसाद पथकामध्ये मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि कासारवाडी येथील साई शारदा महिला औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे ३८ निदेशक, क्रीडा शिक्षक ३५ , वैद्यकीय विभागातील २२ मल्टी पर्पज वर्कर आणि ६४ ए.एन.एम. तसेच माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत शाळांमधील ९८ उपशिक्षक तर ३० सहाय्यकशिक्षक अशा एकूण २८७ कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या जलद प्रतिसाद पथकामध्ये एकूण ४ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. त्यांनी शहरातील नेमुन दिलेल्या भागांमध्ये जाऊन कामकाज करायचे आहे. जलद प्रतिसाद पथकाला शासनाच्या मार्गदर्शक सुचना वेळोवेळी कळविणेत येतील. या पथकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन नागरिकांशी संवाद साधताना त्यांना देखील करोना सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यासाठी आवश्यक त्या सुचना द्याव्यात. तसेच नागरिकांशी उत्त्तम समन्वय ठेवून करोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य पटवून द्यावे. ज्या ठिकाणी खासगी क्लासेस अथवा गर्दी करणारे कार्यक्रम सूरू असतील ते तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करावी. सर्वेक्षण करताना मिळालेली माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत गृहभेटी करून माहिती संकलीत करावी आणि तात्काळ नियंत्रण केंद्रास अहवाल सादर करावा अशी सुचना या प्रशिक्षणा दरम्यान करण्यात आल्या.


















