न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२०) :- पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व एफएल ३ (तारांकीत हॉटेल वगळून) / फॉर्म ई । ई – २ / एफएल ४ ( कायमस्वरुपी ) / एफएल ४ ( तात्पुरती ) या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार (दि. १८ मार्च, २०२० ते दि. ३१ मार्च, २०२०) अखेर पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले आहेत.
या आदेशात त्यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्हयामध्ये कोरोना विषाणू संसर्ग बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाव्दारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. असे प्रवासी पुणे जिल्हयामध्ये परदेश प्रवास करुन आलेले आहेत व बरेच प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.
अशा प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्हयात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे, इत्यादी बाबी टाळणे अत्यावश्यक आहे. उक्तप्रमाणे कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता, सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तिस / इसमास त्याच्या संपर्कात आलेने होण्याची शक्यता विचारात घेता, मी, नवल किशोर राम, अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हादंडाधिकारी पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम १४२ अन्वये मला प्राप्त असलेल्या अधिकारानसार आदेशित करण्यात येत आहे की, पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व एफएल ३ (तारांकीत हॉटेल वगळून) / फॉर्म ई । ई – २ / एफएल ४ ( कायमस्वरुपी ) / एफएल ४ ( तात्पुरती ) या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार दि. १८ मार्च, २०२० ते दि. ३१ मार्च, २०२० अखेर पूर्ण दिवस बंद राहतील. उपरोक्त नमुद केलेल्या दिवशी उक्त मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद ठेवायच्या आहेत. सदर आदेशाच उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमन, १९४९ व त्याअंतर्गत असलेल्या कलम व नियमांनुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल.


















