- पाच रुग्णांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह, दुसऱ्यांदा तपासणीसाठी एनआयव्हीकडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील तीन करोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आता आणखी पाच रुग्णांचे अहवाल आज सकाळी निगेटिव्ह आले आहेत.
शुक्रवारी पाच जणांचे उपचारानंतरचे घशातील द्राव तपासणीसाठी एनआयव्ही कडे पाठवण्यात आले होते. त्याचा तपासणी अहवाल आज सकाळी निगेटिव्ह आला. आता दुसऱ्यांदा तपासणीसाठी त्यांचे घशातील द्राव एनआयव्ही कडे पाठवले जाणार आहेत. हे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ते पाच जण करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट होईल. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, करोनाचे संशयित म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम व भोसरी येथील रुग्णालयात दाखल झालेल्या ३० संशयितांचे तपासणी अहवालही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित सहा करोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तसेच गेल्या सात दिवसांमध्ये शहरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.


















