न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जुलै. २०२०) :- देहूरोड परिसरात असणाऱ्या सोनिगरा ज्वेलर्सवर २००३ मध्ये सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. हे दुकान धनराज केसरीमल यांच्या मालकीचे होते. तेव्हा, पाच जणांनी दरोडा टाकत धनराज यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत २१ तोळे सोन्याचे दागिने आणि ८ लाख ५० हजारांची रोख रक्कम लुटली होती.
याप्रकरणी देहूरोड परिसरात अज्ञात ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान सतरा वर्षांपासून फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट ५ ने अटक केली आहे. रघुवीरसिंग चंदुसिंग टाक असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
यांपैकी, आरोपी रघुवीरसिंग हा गेल्या १७ वर्षांपासून फरार होता. तो वेष बदलून गुंगारा देत होता असे पोलिसांनी सांगितले आहे. अखेर पोलीस अधिकारी राम गोरे यांनी जालना येथून या गुन्हेगाराला शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आरोपीला देहूरोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.