न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२४) :- जुन्या जमान्यातील अवीट गोडीची गाणी, त्याला साजेसे सदाबहार संगीत आणि तरुण उत्साही गायकांच्या सुमधूर आवाजाने नटलेली ” ये शाम मस्तानी ” ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. बावधन येथील ओल्ड एज होममध्ये रविवार दि. २८ रोजी संध्याकाळी या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपळे सौदागर मधील साई पर्ल म्युझिक ग्रुप प्रस्तुत या रंगारंग मैफिलीचा प्रारंभ कुशाग्र शर्मा आणि प्रसिद्धी सोनवणे यांनी सादर केलेल्या ” कोरा कागज था ये मन मेरा ” या द्वंदगीताने करण्यात आला. त्यानंतर अमीत काळंगे , तोरल गोरी, संदीप खोकराळे, श्रीकांत माने या गायक कलावंतांनी एकापेक्षा एक सरस गाणी पेश करत उपस्थित रसिकांची मने जिंकली.
उडत्या चालीच्या काही गीतांवर वयाचे बंधन झुगारुन ज्येष्ठांनी नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला. ” कोई यहाँ नाचे नाचे “, ” परदेसीया ये सच है पिया “, ” परदा है परदा परदे के पिछे ” , ” हसता हुवा नूरानी चेहरा “, ये मेरी जोहराजबी तुझे मालुम नहीं ..या काही गीतांना रसिकांना भरभरून दाद दिली. ओल्ड एज होमच्या सह संस्थापक उर्वशी सोमय्या यांचे या मैफलीसाठी सहकार्य लाभले होते.