- “स्वस्थ पिंपरी चिंचवड – मी एक जबाबदार नागरिक” जनजागृती मोहिमेची सांगता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. ऑगस्ट. २०२०) :- कोरोना विषाणू संसर्गजन्य साथीच्या रोगकाळात २३ जुलै २०२० पासून शहरात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने “स्वस्थ पिंपरी चिंचवड – मी एक जबाबदार नागरिक” ही जनजागृती मोहीम नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेकरिता राबविण्यात येत होती.
गेल्या महिन्याभरात समितीच्या सर्व सदस्य पदाधिकारी ,स्वयंसेवक ,पोलीस मित्र,विशेष पोलीस अधिकारी यांनी शहराच्या प्रत्येक विभागात जाऊन,मास्क, सॅनिटायझर याचे महत्व विशद केले.व सोशल डिस्टन्स चे महत्व सांगून जनजागृती मोहीम राबविली.कोरोनाचे सावट अजूनही कमी झाले नसून आज रोजी पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या ५० हजाराच्या जवळ येऊन ठेपली आहे. याकरिता शहरातील वंचित व दिव्यांग व्यक्तींनाही कोरोना प्रतिबंधात्मक सुरक्षा साधने, ऑक्सिमीटर, वाफेचे भांडे, ‘सी’ व्हिटॅमिन टॅबलेट्स,आर्सेनिक अल्बम होमिओपॅथी बॉटल्स याचे वाटप प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने वात्सल्य दिव्यांग वसतिगृह (देहू) येथे करण्यात आले.
या प्रसंगी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, महाराष्ट्र संपर्क प्रमुख विजय मुनोत, शनिकृपा मेडिकल चे कमलेश चोपडा (चिंचवड), राजेश कर्नावट, ‘वात्सल्य’चे वृषाली देवतरासे, विलास देवतरासे, काळजीवाहक रेवन आहिवळे व दिव्यांग विद्यार्थी हे उपस्थित होते.
या प्रसंगी संपर्क प्रमुख विजय मुनोत म्हणाले,” आपले शहर गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे.नागरिकांनी आता आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने निर्देशित केलेले सर्व नियम पाळणे आवश्यक आहे तरच ह्या साथीच्या आजारावर आपण मात करू शकू, या जनजागृती मोहिमेच्या निमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी आमच्या संस्थेच्या वतीने सुरक्षा साधने व औषधांचे वाटप करण्यात आले.”
समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” स्वस्थ पिंपरी चिंचवड- मी एक जबाबदार नागरिक मोहिमेअंतर्गत समितीच्या सर्व विभागीय अध्यक्ष व सदस्यांनी जनजागृती मोहीम योग्यरित्या पार पाडली.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास नक्कीच मदत झाली आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी समितीच्या मोहिमेकरिता नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.गणेशोत्सव काळामध्ये मंडळांनी मोठ्या प्रमाणात कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदविला, अतिशय साध्या पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना केली.वात्सल्य सारख्या संस्थेमध्ये स्वच्छता व निटनीटकेपणामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचे आरोग्य नक्कीच सुरक्षित राहणार यात शंका नाही.”
“वास्तल्य” च्या कार्यप्रमुख वृषाली देवतरासे म्हणाल्या,” लॉकडाऊन च्या काळात दिव्यांग विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी संस्थेस खूप अडचणी निर्माण झाल्या परंतु अडचणीच्या काळातही सामाजिक संस्थां व प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती, जैन सोशल ऍक्टव्हिटी ग्रुप – डायमंड,आणि बुद्धीजीवी मदत करणारे शहरवासीय यांची मदत संस्थेस मिळाली.त्यामुळे कोरोना काळात नक्कीच दिलासा मिळाला. भविष्यातही संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यासाठी मदतीची आवश्यकता असणार आहे.”














