न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२०) :- नातवाचे अपहरण झाल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात मुलाच्या आजीने नोंदवली होती. प्रकरण गंभीर असल्याने गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा, चिमुकल्याचे अपहरण केलेल्या व्यक्तीचे नाव समोर आले. तो व्यक्ती पुण्यातील एका खासगी रुग्णालयात लपून बसला आहे अशी माहिती देखील मिळाली.
त्यानुसार संबंधित ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. परंतु, त्याच्याकडे अपहरण झालेला मुलगा नव्हता. पोलिसांनी आरोपीकडे कसून चौकशी केली. तेव्हा आपल्याला मुलाच्या वडिलांनीच अपहरण करण्यास सांगितले असल्याचं आरोपीने पोलिसांना सांगितलं.
मुलगा आणि वडील हे उरळी कांचन येथील नातेवाईकांकडे असल्याचं देखील आरोपी मित्राने पोलिसांना सांगितलं. त्यानुसार आज (बुधवार) पहाटे चार वाजेच्या सुमारास पोलिसांनी उरळी कांचन येथील नातेवाईकांकडे जाऊन आरोपी वडिलाला आणि अपहरण झालेल्या मुलाला शोधून काढत तीन वर्षीय मुलाची सुखरूप सुटका केली. मुलाला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले असून, दोन्ही आरोपींना वाकड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
या प्रकरणी चिमुकल्याचा वडिलांसह अपहरण करणाऱ्या मित्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी वडील आणि चिमुकल्याच्या आईचे पटत नाही. पत्नी सोबत राहात नसल्याच्या कारणावरून मुलाचे अपहरण केल्याची कबुली मुलाच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे.















