- कोरोना कालावधीतदेखील शहरातील विकासकामांसाठी स्थायीची ३४ कोटींच्या कामांना मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणा-या ब, ह आणि फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची साफसफाई आधुनिक यांत्रिकी पध्दतीने करण्यासाठी ३ कोटी ८७ लाख रुपये तर प्रभाग क्र १८ मधील डीपी रस्ते विकसित करण्यासाठी २ कोटी ९६ लाख रूपये खर्च केले जाणार आहेत. यासह विविध विकास कामांच्या सुमारे ३४ कोटी २४ लाख ७३ हजार रूपयांच्या खर्चास आज स्थायी समितीने मंजूरी दिली.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष लोंढे होते. सेक्टर क्रमांक २२ येथील जलशुध्दीकरण केंद्रामध्ये विविध युनिटसची स्ट्रक्चरल ऑडीट च्या अहवालानुसार देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी ३ कोटी ६० लाख रुपये खर्च होणार आहेत. महापालिकेच्या अ,ब,ड,ग,ह क्षेत्रीय कार्यालयातील आणि देहू आळंदी रस्त्यामधील तसेच पुणे मुंबई हमरस्ता निगडी ते दापोडी दरम्यान मध्य दुभाजक सुशोभिकरण देखभालीसाठी ३ कोटी ७९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तर डांगे चौक ते जगताप डेअरी येथील साई चौक या बीआरटी रस्त्याचे सुशोभिकरण देखभालीसाठी१८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिका क्षेत्रातील विविध उद्यानांच्या देखभाल व संरक्षणासाठी ३ कोटी ६४ लाख रुपये खर्च होणार आहेत. या खर्चासही बैठकीत मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या अ,ब,फ आणि ग प्रभागातील मैला शुध्दीकरण केंद्र तसेच मैला पाणी पंप हाऊसच्या इमारतीवर ५७ लाख रुपये खर्च करून सोलर सिस्टीम बसविण्यात येणार आहे. निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील क्लॅरीफॉक्यू लेटर ब्रिजची रोटेटिंग असेम्बली बदलण्यात येणार आहेत यासाठी ९६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यासह सुमारे १८ कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चास देखील बैठकीत मान्यता देण्यात आली.















