न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२०) :- ताथवडेतील रावेत-सांगवी बीआरटीएस मार्गावर आज बुधवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास पाच फुटांचा तस्कर जातीचा साप साप दिसल्याने वाहने थांबल्याने गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. साप जागेवर काही फूट उभा राहून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र ते शक्य होत नव्हते.
शेपटाजवळ त्याला जखम झाली असल्याचे दिसून आले. वाकड पोलीस ठाण्यातील होमगार्ड संजय ताटे यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी रिकामे पोते सापाजवळ ठेवले. त्यांच्याकडील काठीच्या साह्याने सापाला पोत्यात ढकलण्याचा प्रयत्न केला.
काही वेळानंतर सापाला पोत्यात घालून पकडण्यात यश आले. सापाला सर्पमित्र गणेश बुटकर यांच्या स्वाधीन केले. त्याला उपचाराची गरज असल्याने कात्रज येथील वन्य पशूपक्षी अनाथालयात सापाला दाखल केले आहे.
















