- ठेकेदाराला मनसे स्टाईलने उत्तर देणार; मनसे शहराध्यक्ष सचिन चिखलेंचा यल्गार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२०) :- नेहरूनगर येथील जम्बो कोविड हॉस्पीटलमध्ये परिचारिकांची आर्थिक छळवणूक होत असून त्याविरोधात मंगळवारी परिचारिकांनी आंदोलन केले. राज्य शासनाच्या वतीने पीएमआरडीच्या माध्यमातून नेहरूनगर येथे कोविड हॉस्पीटल सुरू केले होते. या ठिकाणी रुग्णसेवा देणाऱ्या परिचारिकांना गेल्या दीड महिन्यांपासून वेतन दिले गेले नाही. याबाबत परिचारिकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याची दखल घेऊन मनसेच्या वतीने मंगळवारी दुपारी आदोलन केले.
यावेळी मनसेचे गटनेते सचिन चिखले, पुण्यातील नगरसेविका रुपाली पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना योद्धांचा अपमान करणाऱ्या कोविड केअर हॉस्पिटल संचालकांचा निषेध करण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मनसे गटनेते सचिन चिखल म्हणाले, “जम्बो हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या ३८ नर्सेसला २२ ते ३० हजार रुपये प्रतिमहिना द्यायचे कबूल केले असताना गेल्या दीड महिन्यांपासून त्यांना वेतन दिले नाही. केवळ पाच हजार रुपये देऊन कामावरून कमी केले जात आहे. हा कोरोनायोद्धांचा अपमान आहे. दरम्यान रात्री परिचारिकांना फुटपाथवर रहावं लागले. जेवण राहण हवं, परिचारिकांना पूर्णपणे वेतन द्यायला हवे. तसेच तीन महिन्यांचा करार असताना त्यांना कामावरुन काढून टाकले आहे. ही बाब चुकीची असून रुग्णालय चालकांकडून परिचारिकांना धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत आम्ही पालकमंत्री आणि पीएमआरडीए प्रशासनाची भेट घेऊन हॉस्पिटलमधील कारभाराविषयी तक्रार करणार आहोत.