- रेडिरेकनरनुसार पाच टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याचा राज्याचा प्रस्ताव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२०) :- वडिलोपार्जित मालमत्ता एकाच वारसाच्या नावावर करायची असल्यास संबंधितांना मालमत्तेच्या चालू बाजार मूल्यदर तक्त्यानुसार (रेडिरेकनर) पाच टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याबाबतचा प्रस्ताव नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने राज्य सरकारला पाठवला आहे. राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर राज्यभर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
वडिलोपार्जित मालमत्तेचे समान वाटप होणे अपेक्षित असते. अनेकदा त्यांचे समान वाटप होत नाही. भाऊ आणि बहिणींचे हक्क डावलले जातात. दोनशे रुपयांमध्ये बक्षीसपत्र करून कुटुंबातील एक सदस्य वडिलोपार्जित मालमत्ता आपल्या नावावर करून घेतो. परिणामी त्यातून वाद निर्माण होतात. तसेच त्याचे पर्यवसान गुन्हे घडणे, न्यायालयीन दावे दाखल होण्यापर्यंत होते.
या प्रकारांना आळा घालण्यासाठी, घरातील वाद मिटावेत याकरिता राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने कायद्यात दुरुस्ती करून वडिलोपार्जित मालमत्ता एकाच वारसाच्या नावावर बक्षीसपत्र करायची असेल, तर त्यासाठी मालमत्तेच्या रेडिरेकनरमधील दराच्या पाच टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात यावा, अशी दुरुस्ती कायद्यात प्रस्तावित केली आहे. त्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यांना डावलून सर्व मालमत्ता हवी असल्यास त्या मालमत्तेचा रेडिरेकनरमध्ये जो दर आहे, त्या दराच्या पाच टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. दरम्यान, वडिलोपार्जित मालमत्तेचे वारसांमध्ये समान वाटप करायचे असल्यास त्यासाठी दोनशे रुपयांच्या बक्षीसपत्रावर वाटप होईल, असे विभागाकडून सांगण्यात आले.