- महिनाभर नवीन प्रकल्पांची मंजुरीही रखडणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२०) :- पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सोमवारी जाहीर झाली आहे. आचारसंहिता जारी झाल्याने महापालिका परिसरातील विकासकामे, नवीन प्रकल्पांची अंमलबजावणीस खोडा बसणार आहे.
एक सर्वसाधारण सभा, विषय समितीच्या दोन बैठका, चार स्थायी समितीच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेतली आहे. महापौर उषा ढोरे, महिला बालकल्याण सभापतींची शासकीय वाहन काढून घेतले आहे.
तसेच सत्तारूढ पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि काही पदाधिकारी महापालिकेचे वाहन वापरत नाहीत. त्यामुळे त्यांना आचारसंहिता कालखंडातील भत्ते दिले जाणार नाहीत.
नवीन प्रकल्पांची मंजुरी रखडली
आचारसंहिता कालखंडात मतदारांवर प्रभाव पडेल, असे विषय मंजूर करता येणार नाहीत. तसेच चर्चा करण्यावरही निर्बंध लादले आहेत. पाणी पाणीपुरवठा विभागाची सुमारे शंभर कोटींची कामे काढण्यात आली होती. त्यानुसार मागील आठवड्यातील स्थायी समिती सभेत या विषयावरून वाद झाला होता. टक्केवारीवरून हा विषय आठवडाभरासाठी तहकूब केला होता. आचारसंहितेमुळे हा विषय चार आठवडे मंजूर करता येणार नाही.