- दोन डोस घेतल्यानंतरच शरीरात वाढते रोगप्रतिकारक क्षमता – मुख्यमंत्री…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२१) :- राज्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या तयारीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आढावा घेतला. आठवड्यातील चार दिवस राज्यातील २८५ केंद्रांवर लसीकरण होणार असून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
वर्षा येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. शनिवारी राज्यात लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन अॅपबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली.
या अॅपची कार्यपद्धती अधिक गतिमान होण्याकरिता काही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. त्या केंद्र शासनाला पाठविण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. लसीकरणामध्ये दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रोगप्रतिकारक क्षमता तयार होते. त्यामुळे लसीकरणानंतरही कोरोना प्रतिबंधासाठी जे नियम आहेत त्याचे सर्वानी पालन करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.