न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसें.) :- कालची स्थायी समितीची तहकूब सभा आज बुधवार (दि. १९) रोजी सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगरसेवक विकास डोळस म्हणाले की, बोपखेल-दिघी परिसरात पाणी व कचरा प्रश्न सुटलेला नाही. पाणी टंचाईमुळे प्रभागात टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही टंचाई होवू लागली आहे. त्यामुळे आयुक्तांनी आमच्या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, याकरीता स्थायी समिती सभात्याग केली. यावरता तात्काळ लक्ष न दिल्यास संबंधित अधिका-यांना घरी घालविल्या शिवाय स्वस्थ थांबणार नाही, असा इशारा दिला.
नगरसेवक राजू मिसाळ म्हणाले की, सत्ताधारी नगरसेवकांची कामे अधिकारी करीत नाहीत, मग विरोधकांचा विषयच संपला, पाणी, कचरा, भटकी कुत्रे यासह अन्य प्रश्नावर महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करुन सत्ताधारी नगरसेवकांनी स्थायी समिती सभा त्याग केली. त्यामुळे कामेच होत नसल्याने सत्ताधा-यावर एवढी नामुष्की ओढावली आहे.
अंघोळकर म्हणाले की, शहरात पाणी पुरवठा सतत विस्कळीत होत आहे. मागील महिन्यात आयुक्तांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आठ दिवसाचा अल्टीमेटम दिला होता. तेव्हा आठवडाभर पाणी पुरवठा सुरळीत झाला. मात्र, पिंपळे गुरवला पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना पाणी टंचाई व कचरा प्रश्न भेडसावत आहेत. याशिवाय प्रभागात आम्ही सुचविलेली कामे अधिकारी काढत नाहीत. रस्ते वर्गीकरणाची कामे केली जात नाहीत. त्यामुळे पाणी पुरवठा व कचरा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. तब्बल दीड तास चाललेल्या स्थायी समितीचे सभा अखेर तहकुब करण्यात आली.










