- मारहाणीच्या भीतीपोटी डॉक्टरांकडून पोलीस प्रोटेक्शनची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२१) :- खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आल्याने पिंपरी -चिंचवड शहरातील परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे अडचणीचे झाले असून रुग्णांच्या नातेवाईकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.
शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची गरज असलेले सुमारे बाराशेवर रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र या रुग्णालयांकडील ऑक्सीजनचा साठा मंगळवारी (दि. २०) रात्रीनंतर केव्हाही संपू शकतो. ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी खासगी रुग्णालयांनी प्रयत्न केले. मात्र ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच नवीन रुग्ण दाखल करून घेण्यातही अडचणी येत आहेत.
महापालिका रुग्णालय, जम्बो कोविड सेंटर व ऑटॉक्लस्टर येथील कोविड सेंटर येथेही बॅड शिल्लक नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील रुग्णांना कुठे हलवावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रुग्णांच्या नातेवाइकांनी रोष व्यक्त केल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून खासगी रुग्णालयांकडून पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे.
मध्यरात्री अचानक ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त व पोलिसांनी धावाधाव करत खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवला आहे. चाकण आणि इतर जिल्ह्याला जाणारा साठा इकडे वळवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. बरीच कसरत करत रात्रभर ऑक्सिजन पुरठवा केला.