- दुबईत नेण्याचा कट उघड; वाकड पोलीसांची मोठी कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. मे. २०२१) :- वाकड पोलीस ठाण्याचे कर्मचारी वंदू गिरे व राजेंद्र काळे हे १२ मे रोजी रात्र गस्त घालत होते. त्यावेळी ताथवडे येथे एक चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले. वाहनातील पाचपैकी दोन जण पळून गेले. तर तीन जणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडील मोबाईलची पाहणी केली असता रक्तचंदनाने भरलेल्या ट्रकचे फोटो शेअर केल्याचे दिसले. सदरचे रक्तचंदन चोरीचे असून ताथवडे येथे मोकळ्या जागेत ट्रक आहे, असे आरोपींनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी ट्रकसह रक्तचंदन जप्त केले.
ट्रकला बनावट नंबर प्लेट लावून कर्नाटक येथून मुंबई येथे घेऊन जात होते. तेथून दुबई येथे ते रक्तचंदन पाठवण्यात येणार होते. एक टन रक्तचंदनाला एक कोटी रुपये बाजारभाव आहे. त्यानुसार ६.४२० टन वजनाचे २०७ नग रक्तचंदनाचे ओंडके, एक ट्रक, चारचाकी वाहन, दोन मोबाईल फोन, असा एकूण सहा कोटी ५२ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नीलेश विलास ढेरंगे (वय ३५, रा. पिंपळगाव देपा, संगमनेर, अहमदनगर), एम. एक. सलीम (वय ४३, रा. सागर, जि. शिमोगा, कर्नाटक), विनोद प्रकाश फर्नांडिस (वय ४५, रा. कळंबोली, नवी मुंबई), झाकीरहुसेन अब्दुलरेहमान शेख (वय ५०, रा. चिता गेट, ट्राम्वे, मुंबई), मिन्टोभाई उर्फ निर्मलसिंग मंजितसिंग गिल (वय ३६, रा. कळंबोली, नवी मुंबई), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

















