न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जाने.) :- आगामी लोकसभा व विधानसभेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणाची दिशा व दशा बदलीचे वारे आतापासूनच वाहावयास सुरवात झाली असल्याचे पहावयास मिळत आहे. २०१४ ची लोकसभा व विधानसभेच्या निकालानंतर सत्ताधारी भाजपने जोरदार लॉबिंग करून इतर प्रस्थापित पक्षांचे मातब्बर उमेदवार हायज्याक करून त्यांना भाजपमध्ये आणले व स्वपक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बाजूला सारून इतर पक्षातील उमेदवारांना पदांची खिरापत वाटली. परंतु, जशी-जशी पंतप्रधान मोदींची लाट ओसरू लागली, तशी-तशी भाजपच्या मित्रपक्षांमध्ये अस्वथता वाढू लागली आहे.
त्याचाच प्रत्यय शिवसेनेच्या गुरुवार (दि. १०) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत पहावयास मिळाला. खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत ‘कोण हा पार्थ पवार?’ ‘मी त्याला ओळखत नाही’. ‘असे विधान केले होते. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे ज्यावेळी कॉंग्रेस सोडून शिवसेनावासी झाले त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी, काँग्रेस व इतर पक्षातील कार्यकर्त्यांची साथ लाभली. मोठ्या आशेने राहुल कलाटे यांनी बारणे यांचे २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीचे काम पहिले व त्यांना प्रसंगी मदतही केली. परंतु, बारणे खासदार झाल्यानंतर त्यांना राहुल कलाटे यांचा अडसर वाटू लागला. यातून संघर्ष निर्माण झाला व राहुल कलाटे यांनी खासदार बारणे यांची साथ सोडली.

बारणे यांनी पत्रकार परिषदेत केलेले ते वक्तव्य राहुल कलाटे यांच्या पथ्यावर पडले आहे. खासदार बारणे यांना चिमटा काढण्याची आयतीच संधी कलाटे यांना प्राप्त झाली होती. त्या संधीचे सोने करीत, कलाटे निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर संदीप कदम यांच्या स्मरणार्थ एलआयजी ग्रुपच्या वतीने क्रिकेट टूर्नामेंट आयोजिलेल्या समारंभास उपस्थित राहण्यास हजर झाले. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या हस्ते पार पडला. समारंभानंतर पक्षाच्या एका नगरसेवकाच्या घरी पार्थ पवार यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनीही यावेळी हजेरी लावली होती. याप्रसंगी राहुल कलाटे यांनी पार्थ बरोबर शहरातील तसेच आगामी निवडणुकीच्या विषयावर चर्चा केली. तसेच मोबाईलमध्ये फोटो सुध्दा काढले आणि ते व्हायरल करण्यासाठी सोशल मीडियावर शेअर केले.
यातून शिवसेनेमध्ये सगळेच आलबेल आहे, असे दिसत नाही. खासदार बारणे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या त्या विधानाचे एक शिवसैनिक म्हणून राहुल कलाटे यांनी समर्थन करण्याऐवजी, कलाटे यांनी राष्ट्रवादीच्या वळचणीस जाण्याचा निर्णय घेतला. कलाटे यांनी खासदार बारणे यांना मात्र, आव्हान दिल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. आगामी निवडणुकीच्या मुहूर्तावर कलाटे राष्ट्रवादीत जातात की, स्वपक्षातच राहून बारणे यांनी दिलेल्या वागणुकीचा वचपा काढतात, हे आगामी काळच ठरवेळ? परतू, राहुल कलाटे यांच्या राष्टवादीशी जवळीक साधण्याच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीतील आगामी विधानसभेस इच्छुकांचा जीव मात्र, टांगणीला लागला असेल, यात वादच नाही.











